Navratri festival begins at Manudevi temple : Thousands of devotees had darshan on the first day यावल (23 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील मनुदेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. घटस्थापनेचा मान हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर व क्षीप्रा जुवेकर आणि आडगाव येथील इगल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील व कावेरी पाटील यांना देण्यात आला.

सर्वप्रथम मनुदेवीच्या मूर्तीला जलाभिषेक करून महावस्त्र परिधान करण्यात आले. यानंतर विधिवत घटस्थापना झाली. संपूर्ण विधी झाल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. पौरोहित्य पुजारी स्वानंद धर्माधिकारी, हेमंत धर्माधिकारी, मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर काळे यांनी केले. संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील, नीळकंठ चौधरी, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नितीन पाटील यांच्यासह सर्व संचालकांची उपस्थिती होती. संस्थेने फुलांची सजावट, रोषणाईने मंदिर सजवले आहे. संपूर्ण नऊ दिवसीय उत्सवात देवीच्या मूर्तीला वेगवेगळ्या नऊ रंगांचे शालू परिधान केले जातील, असे संस्थानने सांगितले.
यंदा मंदिरातून सहा हजारांहून अधिक ज्योती रवाना यंदा प्रथमच मनुदेवी मंदिरातून सहा हजारांहून जास्त ज्योत घेऊन भाविक रवाना झाले. जळगाव जिल्ह्यासह अहिल्यानगर, नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि मध्य प्रदेशातील बर्हाणपूर अशा विविध ठिकाणचे हे भाविक होते. त्यासाठी संस्थानने स्वतंत्र व्यवस्था केली होती.