जळगाव जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी साजरा होणार माहिती अधिकार दिन

Right to Information Day on 29th : Organized everywhere in Jalgaon district जळगाव (23 सप्टेंबर 2025) : सामान्य जनतेमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस सर्वत्र माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो परंतु सन 2025 चा माहिती अधिकार दिन हा शासकीय सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी येत असल्याने, यंदा सोमवार, 29 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येणार आहे.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 (1) (ख), कलम 4 (2) व कलम 4 (3) अन्वये सार्वजनिक प्राधिकरणांनी कार्यपद्धती अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि जनतेला आवश्यक माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वेबसाईटवर माहिती प्रकट करणे आवश्यक आहे . या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विभागांनी माहिती अधिकार दिनी व्यापक जनजागृती करावी, सर्व शासकीय, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शैक्षणिक संस्था यामध्ये विविध जनजागृती पर उपक्रम राबवावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शालेय शिक्षण विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीच्या अधिकारावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध, वकृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्रे व व्याख्यानमाला आयोजित कराव्यात. या स्पर्धा आधी घेऊन त्यांचा निकाल 29 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात यावा.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, समाजसेवी संस्था व इच्छुक गटांच्या माध्यमातून भित्तिपत्र स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चर्चासत्रे व व्याख्यानमाला आयोजित कराव्यात या उपक्रमांच्या पारितोषिकांची व्यवस्था लॉयन्स क्लब, रोटरी क्लब अशा विविध समाजसेवी संस्थांच्या सहयोगाने करण्यात यावी. यंदाचा माहिती अधिकार दिन सोमवार, 29 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हात साजरा करण्यात येणार आहे, याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा प्रशासनाने केले आहे.