शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी : 30 सप्टेंबरपर्यंत ज्वारी खरेदीस मुदतवाढ

Good news for farmers: Sorghum procurement extended till September 30 जळगाव (23 सप्टेंबर 2025) : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रब्बी पणन हंगाम 2024-25 अंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत केली आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना आता आधारभूत किमतीवर विक्रीसाठी आणखी संधी मिळणार आहे.

पणन महासंघाचे संचालक तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार यांच्यासह सर्व संचालक मंडळाने राज्य शासन व केंद्र शासनाकडे ज्वारी खरेदी कालावधी वाढवण्याची विनंती केली होती.

केंद्र शासनाने ती मान्य करून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्वारी खरेदीस परवानगी दिली आहे. या निर्णयाची अधिकृत माहिती मंत्रालयातून प्रसिद्ध करण्यात आली असून शासन निर्णयानुसार खरेदी करताना केंद्र शासनाच्या पत्रातील सर्व अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.