Nimbadevi Dam overflows : Tourists prohibited from entering the dam यावल (23 सप्टेंबर 2025) : यावल तालुकावासीयांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकर्यांसह नागरिकांची चिंता मिळली आहे. मंगळवारी येथील सांडव्याद्वारे आता पाणी वाहू लागले असून यावल तहसीलदारांनी सदर क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. या ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्याच नागरिकांनी जाऊ नये, अशा सूचना त्यांनी केल्या आहे. या धरणावर वनविभाग आणि पोलिसांकडून बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.

धरणाच्या सांडव्यावरून वाहिले पाणी
यावल तालुक्यातील पश्चिम भागात सावखेडासीसम या गावापासून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे. दरवर्षी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये सदर धरण भरून जाते आणि सांडव्याद्वारे पाणी वाहू लागते. यंदा सातपुड्यात अल्प स्वरूपात पाऊस झाल्याने धरण भरायला सप्टेंबर महिना उजाडला. सांडव्याच्या ठिकाणी पायर्या निर्माण केल्यामुळे त्यातून वाहणारे पाणी पर्यटकांना खुणावते व दरवर्षी येथे मोठ्या संख्येत पर्यटक येत असतात.
धरणावर जाण्यास मनाई : पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान मंगळवारी प्रथमच सांडव्यातून पाणी वाहू लागले. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर तसेच यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तहसीलदार नाझीरकर यांनी प्रसिद्धी पत्र काढून या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असे सूचित केले आहे व सदर धरण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली. पोलिसांकडून व वन विभागाकडून या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. येथे प्रवेश बंद करण्यात आला असून कुणी अनधिकृतरित्या आल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.