Rape case against police inspector: Victim is a resident of Mumbai अहिल्यानगर (24 सप्टेंबर 2025) : तरुणीवर वारंवार ठिकठिकाणी बलात्कार केल्याप्रकरणी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांच्या विरोधात सोमवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणूक व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, दुसरीकडे दराडे यांनीही पोलिस अधीक्षकांकडे तरुणीविरोधात एक कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार दिली आहे.

काय घडले तरुणीसोबत ?
ऑगस्ट 2023 ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान पालघरच्या मानोर इथल्या फार्महाउस आणि जोगेश्वरी वेस्ट मुंबई येथे हा गुन्हा घडल्याची फिर्याद पीडित तरुणीने दिली. पीडित तरुणी ही मूळची पश्चिम बंगालची रहिवासी आहे व सध्या ती मुंबईमध्ये राहते. दराडे व तिची मुंबई येथे ओळख झाली. दराडे यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पण तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, आपल्यात असलेले अफेअर विसरून जा, असे म्हणून दराडे यांनी तिला शिविगाळ केली. यानंतर तरुणीने दराडे यांना तुझ्यावर केस करेल, असा इशारा दिला मात्र दराडे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत तुझ्यावरच केस करेल अशी धमकी दिली, असे या तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.
मानोर पोलिसात गुन्हा वर्ग
दराडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 69, 352, 351 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मानोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा येथील तोफखाना पोलीस ठाण्यात झीरो क्रमांकाने दाखल करून घेत, मानोर पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास मनोर पोलीस करत आहेत.
निरीक्षकांची तरुणीविरोधात तक्रार
प्रताप दराडे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच, त्यांनी फिर्याद देणार्या त्या तरुणीच्या विरोधात सोमवारी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली. या महिलेने वेगवेगळी कारणे सांगून माझ्याकडून आतापर्यंत पैसे घेतले आहेत. आताही ही महिला माझ्याकडे एक कोटी रुपयांची मागणी करत आहे. पैसे दिले नाहीत, तर तुझ्या विरोधात बलात्काराची खोटी तक्रार देणार आहे, अशी धमकी देऊन माझी पोलिस खात्यात बदनामी करेन, असे म्हणून मला मानसिक त्रास देत आहे, तसेच या महिलेस पोलिस दलातील कोणीतरी मला ब्लॅकमेल करण्यास प्रवृत्त करत आहे. मी या महिलेस दिलेले पैसे, तसेच तिने मला वेळोवेळी केलेले मेसेज माझ्याकडे आहेत. ही महिला आणि माझ्या विरोधात तिला खोटी तक्रार करण्यास प्रवृत्त करणार्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, असे दराडे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.