अखेर जळगावचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले बडतर्फ

Police Inspector Kiran Kumar Bakale dismissed from police service जळगाव (24 सप्टेंबर 2025) : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काढले आहेत.

अवमानजनक भाषेची क्लीप व्हायरल
पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याने आपल्या पोलिस कर्मचार्‍याशी फोनवर बोलताना मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबाबतची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. यानंतर जळगावसह राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. जळगावातील छत्रपती शिवाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी तीव्र आंदोलने करत किरणकुमार बकालेला बडतर्फ करण्याची मागणी केली

विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या चौकशीनंतर बकाले यांच्यावर कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना समक्ष सुनावणीची संधी दिली असली तरी नवे मुद्दे मांडता न आल्याने सेवेतून बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला. संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कारवाई शक्य झाली. छत्रपती शिवाजी ब्रिगेडने या निर्णयाचे स्वागत करत हा मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे.