Heavy rains will continue in the state for a week जळगाव (24 सप्टेंबर 2025) : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून पावसामुळे शेती पिके उद्ध्वस्त झाली असून अनेकांची घरं पडली आहेत तर जनावरेदेखील वाहून गेली आणि शेकडो संसार देखील पाण्याखाली गेले आहेत.

त्यातच हवामान विभागाकडून राज्यात अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात आठवडाअखेर पावसाचा जोर राज्यात पुन्हा एकदा वाढणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. जळगाव जिल्ह्यातही तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर जळगाव जिल्ह्यात आज 24 सप्टेंबरपासून नवीन प्रणाली तयार होऊन गुरुवारपासून तीन दिवस मुसळधारची शक्यता आहे.
पावसाच्या नवीन प्रणालीचा परिणाम म्हणून कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. हाच पट्टा पुढे पावसासाठी कारणीभू ठरणार आहे. म्हणजेच जळगाव शहर व जिल्ह्यात 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आधीच मागच्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी -नाल्यांना पूर आला. जिल्ह्यातील काही ठिकाणी नाल्यांचे पाणी थेट घरांमध्ये शिरले. तर अनेक ठिकाणी शेतीपिके पाण्याखाली गेली. ऐन तोडणीला आलेले मूग, उडीद, सोयाबीन आणि कापसाची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. यावर्षी पेरणीपासूनच विविध संकटांना तोंड देणार्या शेतकर्यांसाठी हा पाऊस ‘आस्मानी संकट’ ठरला आहे. काढणीला आलेले मुगाचे पीक सततच्या पावसामुळे शेतातच कुजून जात आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.