आधी केला समलैंगिक विवाह नंतर पुन्हा चढली बोहल्यावर : तरुणाच्या तक्रारीवरुन तिघांविरोधात गुन्हा

Marriage of a young woman with a homosexual relationship to a young man नाशिक (24 सप्टेंबर 2025) : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तरुणीने आपल्याच मैत्रिणीशी आधी समलिंगी संबंध निर्माण झाल्याने विवाह केला मात्र कुटूंबियांनी या तरुणीचा पुन्हा एका तरुणाशी विवाह लावला. आपली फसवणूक झाल्याचे तरुणाचे लक्षात आल्याने त्याने तक्रार दिल्यावरून तरुणीसह तिच्या आई-वडीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण ?
सामनगाव रोड भागातील विवाहित युवकाने नाशिक रोड न्यायालयात अर्ज दाखल केल्यावरून नाशिक रोड पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित युवकाचा आर्टिलरी सेंटर रोड, मोती मंगल कार्यालयात 2 मे 2024 साली युवतीसोबत विवाह झाला. विवाहामध्ये तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, सोळा ग्रॅमचे सोन्याचे गंठण नववधूला सासरच्यांकडून देण्यात आले होते. तसेच थाटामाटात झालेल्या या लग्नावर युवकाच्या आई-वडिलांचा सुमारे सात लाख रुपयांचा खर्च झाला.

लग्नानंतर दुसर्‍या दिवशी जेजुरी गडावर दर्शनासाठी दोघे गेले. त्यानंतर दोन दिवसांनी नववधू माहेरी गेली. आठवडाभराने पुन्हा नाशिक रोड येथील सामनगाव रोडवर सासरी नांदण्यास आली. तेव्हापासून विवाहिता ही तिची मैत्रीण गौरवी हिच्यासोबत सातत्याने मोबाईलद्वारे व सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होती.

युवकाने जेव्हा तिचा मोबाईल तपासला तेव्हा पत्नीचे बिंग फुटले. त्यानंतर त्याने हा सगळा प्रकार त्याच्या आई-वडिलांसह मुलीच्या आई-वडिलांच्या लक्षात आणून दिला. यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नाशिक रोड यांच्याकडे युवकाने अर्ज दाखल करत घडलेला फसवणुकीचा प्रकार सांगितला. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तरुणीचा पुण्यात समलिंगी विवाह
विवाहित तरुणीने सांगितले की, 7 ऑगस्ट 2023 साली आई-वडिलांनी तगादा लावल्यामुळे मी त्यांचे घर सोडून माझ्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास निघून गेले होते. 7 फेब्रुवारी 2024 साली पुण्यात मैत्रिणीसोबत लग्न केले होते. विवाहितेच्या आई-वडिलांना मुलीचा समलिंगी विवाह झालेला आहे, याबाबत कल्पना असतानाही त्यांनी मुलीचा पीडित युवकाशी लग्न लाऊन देत त्याच्या कुटुंबीयांची फसवणूक केली. सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद केल्यावरून विवाहितेसह तिच्या आई-वडीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.