Three people, including the corrupt policeman from Amalner, were remanded in police custody for one day अमळनेर (23 सप्टेंबर 2025) : अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा व्यवसाय करू देण्यासाठी दरमहा 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजारांची लाच खाजगी पानटपरी चालकाच्या माध्यमातून स्वीकारताना अमळनेर पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचार्यांना धुळे एसीबीने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली होती. लाचखोरांना बुधवार, 24 रोजी न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील (36) व जितेंद्र रमणलाल निकुंभे (33) तसेच पानटपरी चालक उमेश भटू बारी (46, सहारा टॉवर, लोकमान्य शाळेजवळ, अमळनेर) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
असे आहे अमळनेरातील लाच प्रकरण
खास सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार अमळनेरच्या धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीत एलपीजी गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचे काम करतात. दोन्ही पोलिस कर्मचारयांनी हा अवैध व्यवसाय करायचा असल्यास दरमहा 15 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगत अन्यथा तुझ्यावर अवैधरित्या वाहनात गॅस भरल्याचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली होती. तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर एसीबीचे पथक मंगळवारी दुपारपासून अमळनेरात दाखल झाले.
ठरल्याप्रमाणे आरोपींनी लाचेची रक्कम बहादरपूर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मिनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील स्वराज्य पान दुकानदार उमेश बारी यांच्याकडे देण्यास सांगितली व बारी यांनी लाच स्वीकारताच तक्रारदाराने पथकाला सांकेतिक इशारा करताच आधी पानटपरी चालकाला व नंतर दोन्ही पोलिस कर्मचार्यांना अटक करण्यात आली.
तपास धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गछर्शनाखाली पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे व सहकारी करीत आहेत.