Bribe taken through Phone Pay : Field officer of Jalgaon Pollution Corporation caught by Jalgaon ACB जळगाव (24 सप्टेंबर 2025) : प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेला अर्ज रद्द करण्यासाठी 15 हजारांची लाच मागून ती खाजगी पंटराद्वारे फोन पे अॅपवरून स्वीकारताना जळगावातील प्रदूषण महामंडळाच्या क्षेत्र अधिकार्याला जळगाव एसीबीने अटक केली आहे. या कारवाई लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजेंद्र पांडुरंग सूर्यवंशी (42, नवआकाश सोसायटी, धात्रक फाटा, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर खाजगी पंटर मनोज बापू गाजरे हा कारवाईची कुणकुण लागताच पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

असे आहे लाच प्रकरण
रावेरातील एका हॉस्पीटलमध्ये तक्रारदार मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. हॉस्पीटल मालकाने 16 मार्च रोजी हॉस्पीटल बायोवेस्ट संदर्भात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव यांच्याकडे अर्ज केला होता. अर्जात राजेंद्र सूर्यवंशी यांनी त्रृटी काढल्यानंतर नाशिक प्रदूषण मंडळ कार्यालयात अर्ज करण्यात आला व 28 ऑगस्ट 2025 रोजी प्रमाणपत्र मिळवण्यात आले मात्र जळगाव कार्यालयात केलेला अर्ज मागे घेण्यासाठी तक्रारदार 11 सप्टेंबर रोजी गेल्यानंतर सूर्यवंशी 15 हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी 23 सप्टेंबर रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवार, 24 रोजी खाजगी पंटर मनोज बापू गाजरे याने फोन पे द्वारे लाच स्वीकारली मात्र आरोपी पसार झाला तर सूर्यवंशी यास अटक करण्यात आली.
कार्यालयातून घबाड जप्त
विशेष म्हणजे लाचखोर सूर्यवंशीच्या कार्यालयातून एसीबीने झाडाझडतीत सव्वा दोन लाखांचे घबाड जप्त केले तर नाशिकच्या घरात पथकाकडून झडती सुरू असून त्यातही मोठे घबाड सापडण्याची दाट शक्यता आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, नाईक बाळू मराठे, शिपाई भूषण पाटील आदींनी हा सापळा यशस्वी केला.