अमळनेरातील संशयीताकडून दोन गावठी कट्टे जप्त

Two village knives seized from suspect in Amalner अमळनेर (25 सप्टेंबर 2025) : अमळनेरातील संशयीताकडून दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. जळगाव गुन्हे शाखेसह अमळनेर पोलिसांनी ही कारवाई केली. अटकेतील आरोपीला भुसावळसह पाचोर्‍यातील आरोपींनी उमर्टी येथून शस्त्र आणून विकल्याची माहिती समोर आली आहे. अनिल मोहन चंडाले (गांधलीपूरा, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई 25 रोजी मध्यरात्री 12 वाजून 10 वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाजवळील इंदिरा भुवनाजवळ करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एलसीबीचे हेड कॉन्स्टेबल विष्णू बिर्‍हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील हे अमळनेर शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना त्यांना पोलिस उपनिरीक्षक सोपान मोरे यांनी कळविले की, यावल येथील युवराज उर्फ युवा राजू भास्कर याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन कडतुस सापडले असून संशयीताने भूषण कैलास सपकाळे (भुसावळ) व समाधान बळीराम निकम (पाचोरा) यांनी तीन कट्टे व सहा काडतुस उमर्टी येथून आणले व भूषणने ते युवराजला विकले व त्याने दोन कट्टे व चार काडतुसे अमळनेर येथील अनिल मोहन चंडाले याला विकले.

अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांसह पोलिस निरीक्षक शरद काकळीज, संतोष नागरे, नितीन मनोरे यांनी अनिल चंडाले याला इंदिरा भुवनाजवळ ताब्यात घेत त्याच्याजवळून दोन गावठी पिस्तुल आणि चार काडतूस असा 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.