83 वर्षीय वृद्धाला बसने चिरडले : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

An elderly man from Nimkhedi was crushed by a speeding bus मुक्ताईनगर भुसावळ (25 सप्टेंबर 2025) :  कुर्‍हाकाकोडा येथून बाजार करून आपल्या गावी परतणार्‍या निमखेडीतील 83 वर्षीय वृद्धाला बसने चिरडल्याची घटना बुधवार, 24 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली. सुपडा निनू सोनवणे ( 83, रा. निमखेडी बुद्रुक, ता. मुक्ताईनगर) असे मृताचे नाव आहे.

बाजार करून परतताना अपघात
सुपडा सोनवणे हे आपल्या पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडांसह निमखेडी बुद्रुक येथे वास्तव्याला होते. बुधवारी कुर्‍हाकाकोडा येथे बाजार असल्याने ते बाजारात गेले होते.

पोलिसांनी आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बाजार आटोपून सुपडा सोनवणे हे पायी घरी परतत असताना भरधाव बस (एम.एच.20 बी.एल.1770) ने सोनवणे यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे सोनवणे हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या अपघाताची माहिती मिळताच सोनवणे यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्घटनेबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.