भुसावळातील 69 वर्षीय निवृत्ताची 20 लाखात फसवणूक

Retired man from Bhusawal duped of Rs 20 lakhs under the guise of digital arrest भुसावळ (26 सप्टेंबर 2025) : सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली शहरातील 69 वर्षीय रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेल्या नागरिकाची तब्बल 19 लाख 95 हजार 237 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले सेवानिवृत्तासोबत ?
सुरेश नथ्थु धांडे (रा. प्लॉट क्र.15, प्रोफेसर कॉलनी, शेनफडवाडी, भुसावळ) यांना 17 ते 23 सप्टेंबरदरम्यान अनोळखी मोबाईल (क्रमांक 9637137817) व व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 7718894613 वरून कॉल करण्यात आला. संशयीतांनी ‘तुमच्या बँक खात्यात दहशतवाद्यांचे पैसे जमा झाले असून तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना अटक होईल, असा खोटा विश्वास निर्माण केला. व्हिडिओ कॉलवर नजर ठेवून धांडे यांना घराचे दरवाजे-खिडक्या बंद करण्यास भाग पाडले. त्यांचे आधारकार्ड अंधेरी (मुंबई) येथील कॉसमॉस बँक खात्याशी लिंक असल्याचे सांगितले. या दबावाखाली आणून धांडेंच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील पैसे लुधियाना शाखेतील खात्यात ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. एकूण 19 लाख 95 हजार 237 रुपयांची फसवणूक झाल्याने धांडे यांनी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

फसव्या कॉलपासून सावधान !
सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की ,अशा प्रकारच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फोन कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलवर अजिबात विश्वास ठेवू नये, बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती शेअर करू नये आणि तत्काळ सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधावा.