Minister Sanjay Savkare’s follow-up : The Northern Division office of the State Bank Department will come to Bhusawal! भुसावळ (26 सप्टेंबर 2025) : भुसावळ विभागातील नागरिकांसाठी दिलासा देणारा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाचे जळगाव येथील विभागीय कार्यालय आता भुसावळ येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

वेळेसह खर्चात होणार बचत
शासनाने नुकत्याच काढलेल्या निर्णयानुसार या कार्यालयाचे नामाभिधान कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग, भुसावळ असे करण्यात आले आहे. नागरिकांना जळगावला जावे लागणार नाही,ही मोठी सोय ठरणार आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
शासनावर पडणार नाही अतिरिक्त खर्चाचा भार
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक यांच्या प्रस्तावानुसार हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत जळगाव येथे कार्यालय असल्याने भुसावळसह परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामकाज, तक्रारी आणि इतर बांधकामविषयक कामांसाठी जळगावला वारंवार जावे लागत होते त्यामुळे वेळ व खर्चाचा अपव्यय होत होता.शासनाने या अडचणी लक्षात घेऊन कार्यालय भुसावळ येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे, या स्थलांतरामुळे शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.मंजूर पदांसह हे कार्यालय भुसावळ येथे कार्यरत राहणार आहे. शासन निर्णयानुसार हा आदेश अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे. तो डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध झाला आहे. याबाबत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, भुसावळकरांसाठी हे कार्यालय आवश्यक होते. नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी मी स्वतः मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा केला.अखेर शासनाने हा निर्णय घेऊन कार्यालय भुसावळ येथे स्थलांतरीत करण्यास मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील विशेषतः भुसावळ, यावल, रावेर आदी तालुक्यातील नागरिकांना तातडीच्या सेवांचा लाभ जवळून घेता येणार आहे. प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणेही अधिक सुलभ होणार आहे.