A dumper crushed a couple and a child in Muktainagar : Jalgaon resident dies मुक्ताईनगर (26 सप्टेंबर 2025) : सुसाट वेगातील डंपरने दुचाकीवरून जाणार्या कुटूंबाला जबर धडक दिल्याने दाम्पत्यासह त्यांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चिमुकला गंभीर जखमी झाला. मन विषन्न करणारा हा भीषण अपघात मुक्ताईनगरमधील पूर्णाड फाट्यावर शुक्रवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घडला. संतप्त जमावाने डंपरची कॅबीन पेटवून दिली मात्र काहीच वेळात आग विझवण्यात आली.

दरम्यान, अपघातात नितेश जगतसिंग चौहान, सुनीता नितेश चौहान या दाम्पत्यासह त्यांचा मुलगा सुखविंदर नितेश चौहान (सर्व रा.मातापूर, ता.खकनार, जि.बर्हाणपूर, ह.मु.सिव्हील हॉस्पीटलमागे, जळगाव) अशी मृतांची नावे आहेत तर दाम्पत्याचा मुलगा नेहाल नितेश चौहान हा गंभीर जखमी झाला आहे.
एकाच कुटूंबातील तिघे ठार
मुक्ताईनगरच्या पूर्णाड फाट्यावर डंपर (एम.एच.19 सी.एक्स.2038) ने समोरून येणार्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरुन प्रवास करणार्या एकाच कुटुंबातले तीन जण ठार झाले तर त्यात दाम्पत्याचा मुलगा जखमी झाला. या अपघातामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी डंपरची कॅबीन पेटवून देत वाहनाच्या काचा फोडल्या तर काहीच वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
डंपर चालकाविरोधात गुन्हा
अपघातस्थळी पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ व सहकार्यांनी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली. अपघात प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गौण खनिजाची वाहने सुसाट
मुक्ताईनगरसह परिसरात गौण खनिज वाहतूक करणारे वाहने सुसाट धावत असून या वाहनांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. आरटीओ प्रशासनासह महसूल व पोलिस प्रशासनाने आपले अस्तित्व दाखवून मुजोर वाहतूकदारांवर कारवाई करावी, अशी माफक अपेक्षा तालुकावासी व्यक्त करीत आहेत. गौण खनिज वाहतूकदारांना राजाश्रय लाभला असल्याने त्यांची हिंमत दिवसागणिक वाढत चालल्याचा आरोप होत आहे.