मनुदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी आजपासून खाजगी वाहनांना बंदी

मानापुरीपासून एसटी महामंडळाची बस सेवा भाविकांना उपलब्ध

Private vehicles banned from entering Manudevi temple from today यावल (27 सप्टेंबर 2025) : शारदीय नवरात्रोत्सवात मनुदेवी मंदिरावर भावकांची होणारी गर्दी पाहता शनिवार, 27 ते 30 सप्टेंबरपर्यंत वनक्षेत्रात खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

मानापुरी येथे वाहनतळ उभारण्यात आले असून येथून भाविकांना एस.टी.महामंडळाच्या बसद्वारे पुढील प्रवास करावा लागेल तसेच मंदिरात होणार्‍या महायज्ञासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

खाजगी वाहनांना प्रवेश बंदी
सातपुडा निवासी मनुदेवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रानिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते आहे. शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शनिवारपासून मानापुरीच्या पुढे खाजगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली.

मानापुरी गावाजवळ मंदिर संस्थानकडून वाहनतळ उभारण्यात आले आहे तसेच या ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या यावल आगाराकडून आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बस स्थानक उभारण्यात आले आहे. तेथे वाहतूक नियंत्रकांसह अन्य कर्मचार्‍यांची नियुक्ती झाली आहे. या ठिकाणाहून भाविकांना मंदिरात जाण्यासाठी बसने प्रवेश करावा लागेल.

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात विविध सुविधा केल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष शांताराम पाटील, निळकंठ चौधरी, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नितीन पाटील, सतीश पाटील आदींनी दिली.

अष्टमीला होणार महायज्ञ
मनुदेवीच्या मंदिरात 30 सप्टेंबरला अष्टमीनिमित्त महायज्ञ होणार आहे. महायज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ज्या भाविकांना नावनोंदणी करायची असेल त्यांनी मंदिर संस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.