Flood situation in the state: MPSC exam now on November 9 मुंबई (26 सप्टेंबर 2025) : राज्यातील पूरस्थितीमुळे येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आता 9 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. आयोगाने शुक्रवार, 26 रोजी जारी केलेल्या एका शुद्धिपत्रकाद्वारे हा निर्णय कळवला आहे.

अतिवृष्टीमुळे परीक्षा लांबणीवर
राज्यात सध्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे हाहाकार माजला आहे. अनेक गावांना पुराचा विळखा पडला आहे त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच लहान मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली.
9 नोव्हेबरला होणार परीक्षा
राज्यातील पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार आयोगाने रविवार, 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकण्याची घोषणा करीत 9 नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे.
आयोगाने काढले शुद्धिपत्रक
आयोगाने आपल्या शुद्धिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवरील 524 उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. तथापि, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांतील विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांक अर्थात 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येईल.
या शुद्धिपत्रकावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपसचिव, जाहिरात यांची स्वाक्षरी आहे.