Proposal to provide halt for trains on Bhusawal Railway Cord Line to headquarters for the second time: DRM’s information भुसावळ (27 सप्टेंबर 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणार्या 16 रेल्वे गाड्या या मलकापूरहुन सुटल्यावर भुसावळ जंक्शनवर न येता त्या कॉर्डलाईन मार्गे खंडव्याकडे वळून जात असतात. या गाड्यांना कॉर्ड लाईनीला थांबा द्यावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 25 मे 2023 रोजी प्रस्ताव पाठविला, मात्र, त्यात त्रुटी निघाल्याने त्या त्रृटी दुरूस्त करून हा पुन्हा 4 एप्रिल 2025 या दिवशी नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. म्हणजे तब्बल 23 महिन्यात त्रृटी दूर करून दुसर्यांना प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर येथे रेल्वे गाड्यांना थांबा मिळेल, अशी माहिती डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी रेल्वे सल्लागार समितीच्या बैंठकीत दिली. .

सल्लागार समितीची बैठक
भुसावळ डीआरएम कार्यालयात शुक्रवारी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठक झाली. डीआरएम पुनीत अग्रवाल अध्यक्षस्थानी होते. वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांनी प्रस्तावना केली. यावेळी विभागातील रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, रेल्वेच्या विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. डीआरएम अग्रवाल यांनी विभागात सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत माहिती दिली. नवीन सुरू झालेल्या गाड्या, नव्याने थांबा देण्यात आलेल्या गाड्या याबाबत माहिती सविस्तर सांगितली. भारतीय रेल्वेत उत्पन्नात भुसावळ विभाग प्रथम आल्याचे सांगत भविष्यात सुध्दा प्रवाशांच्या सुविधांवर सकारात्मक चर्चा करून सुविधा पुरविण्याचे सांगितले.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला मनीष करवा (अमरावती), अशोक अग्रवाल (मलकापूर), यशवंत जासूद (भुसावळ), माधुरी शर्मा (शेगाव), राजनारायण मिश्रा, उन्मेश मालू (अकोला), पंकज नाटानी (बर्हाणपूर), संजय सोनवणे (नाशिक) तसेच एडीआरएम सुनील कुमार सुमन, एडीआरएम एम.के. मिणा यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सदस्यांच्या प्रश्नावर चर्चा
यावेळी सल्लागार समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. यात संपूर्ण विभागातील समस्या सदस्यांनी उपस्थित केल्या होत्या. त्यावर सकारात्मक चर्चा झाली. कुठे पार्कीगचा प्रश्न तर कुठे लिफ्ट सुरू करण्याचा प्रश्न, चाळीसगाव येथे जाण्यासाठी सकाळी 11 नंतर दुपारी 4 वाजेपर्यत रेल्वे गाडी नसल्याची समस्या सदस्य जितेद्र देशमुख यांनी मांडली तर भुसावळ कॉर्डलाईनवर गाड्यांना थांबा द्यावा, अथवा वरणगाव येथे कॉर्डल ाईनीच्या गाड्यांना थांबा द्यावा, असा मुद्दा राजेश भराडे यांनी मांडला. अनिरूध्द कुळकर्णी यांनीही अवैध विक्रेते यांचा प्रश्न उपस्थित केला.
तीन कोटी भाविक कुंभला येण्याची शक्यता
नाशिक येथे होणार्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून सुमारे तीन कोटी भाविक तेथे येण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून नाशिक व परिसरातील रेल्वे स्थानकांचे अद्यावतीकरण केले जात आहे. काही गाड्यांना या रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे. गर्दी विभागण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. एकाच ठिकाणी होणारी गर्दी यामुळे विभागली जाणार असल्याचे डीआरएम अग्रवाल यांनी सांगितले.