गुन्हेगारी बोकाळली : नाशिकमध्ये 12 तासात दोन तरुणांना संपवले

Nashik shaken: Brutal murder of two youths in 12 hours नाशिक (27 सप्टेंबर 2025) : नाशिकमध्ये गुन्हेगारी बोकाळली असून अवघ्या 12 तासात दोन तरुणांचे खून झाल्याचे समोर आले आहे.

सातपूरात तरुणाचा खून
सात महिन्यांपूर्वी सटाणा येथील कंधाणे येथून कामधंदा करण्यासाठी सातपूरला आलेल्या जगदीश परशराम वानखेडे (23, रा. श्रमिकनगर) या तरुणाचा बुधवार, 24 रोजी रात्री त्याला रस्त्यात अडवून कुरापत काढत धारदार शस्त्राने वार करत खून केला. सातपूर पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य यादव (21) याच्यासह दहा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

टवाळखोरांनी केला खून
बुधवारी जगदीश हा त्याचा मित्र मयूर निकम याच्यासोबत दुचाकीने रात्री 11 वाजेच्या सुमारास घराकडे जात होता. यावेळी रस्त्यात त्यांना काही टवाळखोरांच्या टोळीने रोखले. कुठलेही एक कारण नसताना कुरापत काढत जगदीशच्या कानशिलात लगावली. गाडी नीट चालवता येत नाही का? असे म्हणत जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. टोळक्याने खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि शस्त्रे काढून जगदीशच्या छातीवर आणि पाठीत सपासप वार केले त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मयूर व त्याचा दुसरा मित्र अजय याने काही नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत जगदीश यास शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही वेळेतच वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

भरदिवसा कॅफेमध्ये युवकाला संपवले
पाथर्डी फाट्याकडे जाणार्‍या रस्त्यावरील एका कॅफेमध्ये बसलेल्या युवकावर गुरुवार, 25 रोजी पूर्व वैमनस्यातून चॉपर, कोयत्यांनी सपासप वार करून खून करण्यात आला. या हल्ल्यात राशीद हारुन खान (22, रा. अंबड लिंक रोड, खाडी) यांचा मृत्यू झाला.

अंबड लिंक रोडवर असलेल्या दत्तनगर व खाडीच्या भागात राहणार्‍या राशिद याच्यासोबत त्याच भागातील ‘गॅस गैंग’मधील टोळक्याने काही महिन्यांपूर्वी वाद घातला होता. तेव्हाही अंबड पोलिसांकडे तक्रार दिली होती. तेव्हाही पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, पाथर्डी फाट्याकडे जाणार्‍या रस्त्यावरील निसर्ग कॉलनी परिसरात असलेल्या एका कॅफेमध्ये राशिद हा त्याच्या मैत्रिणीने बोलविल्यामुळे चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी त्या युवतीने मारेकर्‍यांना तो आल्याबाबतची माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी तेथे येऊन चॉपर, कोयत्याने राशिदवर वार केले. आतापर्यंत शहरात 37 खून झाले असून वाढत्या गुन्हेगारीने सामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.