कवी ना.धों.महानोर अष्टपैलू व्यक्तिमत्व: अशोक जैन

कविवर्य ना.धों.महानोर साहित्य शेती-पाणी पुरस्कार सोहळा

Poet Mahanor’s valuable work for agriculture and water along with his literature: Ashok Jain मुंबई (27 सप्टेंबर 2025) : जैन इरिगेशनचे संस्थापक तथा वडील भंवरलाल जैन यांच्यासोबत कविवर्य ना.धों.महानोर यांची शेती आणि साहित्यावरील चर्चा ऐकणे म्हणजे मेजवानी असायची. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणजे जणू दुग्धशर्करा योग जळून येत होता. शेतकर्‍यांचे जीवन उत्तम कसे होईल आणि त्यांच्या चेहर्‍यावर कसे हास्य फुलेल यासाठी ना. धों. महानोर काम करत राहिले. ते अष्टपैलू होते. कविता, साहित्य, चित्रपट गीते लिहिताना त्यांनी शेती आणि पाण्यासाठी मोलाचे कार्य केले, असे गौरवोद्गोगार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले. ते शुक्रवार, 26 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्यावतीने देण्यात आलेल्या ना.धों.महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्यावतीने कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार सोहळा मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, उद्योजक अशोक जैन, खासदार सुप्रिया सुळे, ना. धों. महानोर यांच्या कन्या सरला महानोर-शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्राच्या सहा विभागातून गीतकार अविनाश पोईनकर (चंद्रपुर), मुक्त पत्रकार हिना कौसर खान (पुणे), कवी-गीतकार वैभव देशमुख (बुलढाणा), सुचिता खल्लाळ (नांदेड) यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार तर पालघरमधील साधना उमेश वर्तक आणि नंदुरबारमधील कुसुम सुनील राहसे यांना कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येकी 25 हजार रूपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.

अरुणभाई गुजराथी यांनी मनोगतात सांगितले की, ना. धों. महानोर हे महान आणि महाकवी होते; त्यांनी कवितेच्या माध्यमातून समाजाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रत्येकाशी असलेली मैत्री ही निखळ आणि निरागस होती.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात, महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे कार्यक्रम करायचा की नाही या द्विधा मन:स्थितीत आम्ही होतो. आज ना. धों. महानोर असते तर त्यांनी महाराष्ट्राची वेदना कशा प्रकारे शब्दबद्ध केली असती, हे सांगणे कठीण आहे. आजच्या नवकवींनी त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवतील, अशी आशा व्यक्त केली. महानोरांच्या कन्या सरला महानोर-शिंदे यांनी वडीलांच्या आठवणी जागवल्या. दत्ता बाळसराफ यांनी ना. धों. महानोर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या ऋणानुुबंधांची आठवण सांगत कार्यक्रमाचे संचालन केले.