जळगावात बनावट कॉल सेंटर : ललित कोल्हेंसह आठ जणांना अटक

Fake call center on former mayor’s farm in Jalgaon exposed: Eight arrested including Lalit Kolhe जळगाव (29 सप्टेंबर 2025) : जळगावात ममुराबाद रोडवरील शिवसेनेचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के.फार्म हाऊसमधील इमारतीमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा टाकत आठ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तब्ब्ल 31 लॅपटॉप जप्त केले असून या ठिकाणी मुंबईवरून तीन जण हे कॉल सेंटर हँडलिंग करत असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ललित कोल्हेंसह संशयीत अटकेत
पोलिसांनी कॉल सेंटर संचालक नरेंद्र चंदू आगरीया, राकेश चंदू आगरीया, शाहबाज आलम, जिझान आलम, शाकीब आलम, हासील राशीद (सर्व रा.कोलकत्ता) तसेच अली नामक स्वयंपाक व ललित कोल्हे यांना ताब्यात घेतले आहे.
जळगावात बोगस कॉल सेंटर
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, ममुराबाद रोडवरील एल.के.फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती जळगाव पोलिस दलाला मिळाली होती व अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व इतर पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये रविवार, 28 रोजी दुपारी एल.के.फार्म हाऊसवर पोलिसांनी धाड टाकताच बोगस कॉल सेंटरचा सेटअप लावलेला आढळला. पोलिसांनी 31 लॅपटॉप जप्त केले असून त्यातील दोन हे सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

लॅपटॉपच्या माहितीनुसार अ‍ॅमेझॉन व इतर कंपन्यांच्या नावे रात्री विदेशातील नागरिकांना कॉल करून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून काही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.