Fadnavis should revolt against Delhi for the farmers: Sanjay Raut मुंबई (29 सप्टेंबर 2025) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या शेतकर्यांच्या वेदना दिल्लीत जाऊन वारंवार मांडल्या पाहिजेत. यासाठी त्यांनी बंड केले पाहिजे. शेतकर्यांसाठी फडणवीसांनी दिल्ली विरोधात बंड करायला हवे. माझा शेतकरी मरतोय त्याला तुम्ही मदत द्या, असे फडणवीस यांनी दिल्ली दरबारी जात म्हटले पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

तर प्रतिष्ठा लावावी पणाला
संजय राऊत म्हणाले की, शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा पणाला लावली पाहिजे. हे त्यांनी केल्याशिवाय मराठवाड्याला हवी ती मदत मिळणार नाही, असे राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यामध्ये गेले म्हणून एकनाथ शिंदे यांना तिथली परिस्थिती समजली आहे. शेतकर्यांना मदत करणे हे शिंदेंचे कामच आहे, मदत केली म्हणजे काय उपकार करत आहात का? तुम्ही सरकार आहात. विरोधी पक्ष हा आरसा दाखवण्याचे काम करत असतो हे जर शिंदे यांना समजत नसेल तर त्यांनी राजकारणात राहू नये.
गृहमंत्री प्रचारसभांमध्ये व्यस्त
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे संकट निर्माण झाले आहे. राज्यात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. गृहमंत्र्यांनी अशा वेळेला पूरपरिस्थितीची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाणं गरजेचे असते. पण ते उंटावरून शेळ्या हाकत आहेत. ते भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीत अडकलेले आहेत. ते पाटणा मध्ये बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी जात आहेत. ते बीसीसीआयचा अध्यक्ष कुणी निवडायचा हे ठरवत आहेत. पण ते संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूरमध्ये गेले नाहीत.मुख्यमंत्री काल आम्हाला दिसून आले. पण मदतीचे काय? असा सवाल राऊत यांनी केला आहे.