‘गिरणा व मन्याड’ नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी : नागरिकांचे तातडीने स्थलांतर

आमदार मंगेश चव्हाण व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची मन्याड धरण, नांद्रे व सायगाव येथे दिली भेट

चाळीसगाव (29 सप्टेंबर 2025) : चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या खूप मोठ्या प्रमाणात (35 हजार 188 क्यूसेस) पाण्याचा विगर्स धरणातून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविवार, 28 रोजीआमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मन्याड धरणाची व धरणाच्या पायथ्याशी असणार्‍या नांद्रे गावाची पाहणी केली.

पावसाचा जोर असाच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर सर्व नांद्रे गावाच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तयार राहण्याच्या सूचना दिल्या. शासन, प्रशासन आपल्या सोबत असून कुठल्याही प्रकारची आपल्याला कमतरता पडणार नाही याची ग्वाही आमदार चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिली.

पूर स्थितीचा घेतला आढावा
यावेळी त्यांनी गिरणा व मन्याड नद्यांचा संगमावर असणार्‍या सायगाव येथे भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू आहे व खबरदारीच्या दृष्टीने सर्वांनी सतर्क राहण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या. विशेषतः नदीकाठी राहणार्‍या ग्रामस्थांनी आपल्या कुटुंब व जनावरांसह स्थलांतरित होण्याची विनंती केली.

आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मी वैयक्तिक शासन – प्रशासनासह परिस्थीतीवर लक्ष ठेवून असून स्थानिक भाजपा पदाधिकारी देखील मदतीसाठी सदैव उपलब्ध आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडून येणार्‍या सूचनांचे पालन करावे व आपली काळजी घ्यावी.