एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा : महागाई भत्ता वाढवला, अपघाती विमा आणि मोफत प्रवासाचा लाभ

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा : महागाई भत्ता वाढवला, अपघाती विमा आणि मोफत प्रवासाचा लाभ

मुंबई,  (प्रतिनिधी) – आर्थिक अडचणींवर मात करण्याचा निर्धार करत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णयांची घोषणा केली आहे. यामध्ये महागाई भत्त्यात वाढ, अपघाती विमा, मोफत प्रवास पास आणि आरोग्य सेवा योजनांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसूळ, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष माधव पदचारी उपस्थित होते.

🔹 महागाई भत्त्यात ५३% पर्यंत वाढ

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून थेट ५३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला असून, यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

🔹 एक कोटी रुपयांचा अपघाती विमा

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, अपघातामध्ये मृत्यू झाल्यास एक कोटी रुपयांपर्यंतची विमा रक्कम देण्यात येणार आहे. पूर्णतः अपंगत्व आल्यासही ही विमा रक्कम लागू असेल. स्टेट बँक ऑफ इंडियाशी यासाठी करार करण्यात आला आहे.

🔹 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास

जून २०२५ पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नीला एसटीतून वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. याचा ३५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.