श्री महेश नवमी उत्सवानिमित्त जळगावात दुचाकी रॅली, आरोग्य तपासणी शिबिर, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव | ४ जून – श्री महेश नवमी उत्सवानिमित्त जळगावात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्सवाच्या निमित्ताने ३ जून रोजी शहरातून काढण्यात आलेली भव्य दुचाकी रॅली आणि आरोग्य तपासणी शिबिराने नागरिकांचे लक्ष वेधले. याशिवाय महाआरती, अभिषेक, रक्तदान शिबिर आणि भजन संध्येसारखे कार्यक्रमही पार पडले.
सोमवार, २ जून रोजी सकाळी विसनजी नगरमधील प्रेमाश्री रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. धीरज बडाले व डॉ. प्रीती बडाले यांनी एकूण ३५४ नागरिकांची तपासणी केली.
मंगळवार, ३ जून रोजी सकाळी आदर्शनगरमधील महादेव मंदिरात महाआरती पार पडली. सायंकाळी ५ वाजता श्री महेश चौक, रिंग रोड येथून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीने ख्वॉजमिया चौक, शिवतीर्थ चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, एम.जे. कॉलेजमार्गे पुन्हा महेश चौकात समारोप केला. रॅलीने उत्सवाला उत्साहाची रंगत दिली.
बुधवार, ४ जून रोजी सकाळी ६ वाजता बालाजी मंदिरात भगवान महेश यांचा अभिषेक आणि महाआरती होणार आहे. यानंतर पांजरापोळ गोशाळेत गोमातेला लापशीचे वितरण होईल. सकाळी १०.३० वाजता माहेश्वरी बोर्डिंग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी दुपारी ४.३० वाजता भव्य शोभायात्रा शहरात निघणार आहे.
उत्सवानिमित्त भजन संध्या कार्यक्रमात विनोद बलदवा आणि पवन झंवर यांनी भक्तिगीतांची साद घालून भक्तीमय वातावरण निर्माण केले. श्री महेश नवमी उत्सवामुळे शहरात भक्तिभाव आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.