वर्षभरात तिसर्‍यांदा कोयना परिसराला भूकंपाचा धक्का

Earthquake jolts Koyna area at night कोयनानगर (30 सप्टेंबर 2025) : कोयना परिसरात सोमवारी रात्री भूकंपाचा धक्का जाणवला असून वर्षभरात तिसर्‍यांदा हा धक्का जाणवल्याचे सांगण्यात आले. या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल नोंदवली गेली होती. पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात सोमवारी रात्री 12 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

सौम्य प्रकारच्या धक्क्याची तीव्रता वर्ग तीनमध्ये आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना भुकंपमापन केंद्रापासून चार किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येला तीन किमी होता. तर या भूकंपाच्या केंद्रबिंदुची खोली पाच किलोमीटर अंतरावर होती. भूकंपाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानीची झाली नाही.

वर्षभरात तीन वेळा जाणवले धक्का
यापूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी देखील कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता. दुपारी 2:45 च्या सुमारास झालेल्या त्या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली होती. त्याचा केंद्रबिंदू धरणापासून जवळपास 41 किलोमीटर अंतरावर होता. तो वारणा खोर्‍यातील तानमळा गावाच्या पूर्वेला 10 किलोमीटर आणि चिपळूणच्या दक्षिणेला 11 किलोमीटर अंतरावर होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या काही वर्षांत कोयना धरण परिसरात असे छोटे-मोठे धक्के नियमितपणे जाणवत असल्याने हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून विशेषत्वाने अधोरेखित केला जातो.