गुन्ह्यातील तपासात सहकार्यासाठी लाच घेणारा लोणावळ्यातील सहा.पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात

Bribe of Rs 20,000 taken: Assistant Police Sub-Inspector in ACB’s trap पुणे (1 ऑक्टोबर 2025) : 20 हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला एसीबीने अटक केली आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागताना ही कारवाई करण्यात आली. शकील मोहम्मद शेख (45) असे अटकेतील अधिकार्‍याचे नाव असून तो लोणावळा शहर पोलिसात नेमणुकीला आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोजिलस उपनिरीक्षक शकील शेख यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी शकील शेख याने तक्रारदाराकडे 25 हजारांची लाच मागितली.

तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने एसीबीकडे 23 सप्टेंबर रोजी तक्रार दिल्यानंतर 23, 24 व 25 सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. 25 सप्टेंबर रोजीच्या पडताळणीमध्ये शकील शेख याने गुन्ह्यांचे तपासामध्ये मदत करण्यासाठी साहेबांना देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी लोणावळा शहर पोलिस ठाण्याअंतर्गत नारायणीधाम पोलीस चौकीत सापळा लावण्यात आला.

तक्रारदाराकडून 20 हजार रुपये स्वीकारताना शकील शेख याला पकडण्यात आले व लोणावळा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर व त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा यशस्वी केला. सहायक पोलिस आयुक्त भारती मोरे अधिक तपास करीत आहेत.