Sharad Pawar and Ajit Pawar meet after split in NCP मुंबई (1 ऑक्टोबर 2025) : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविधांगी चर्चांना ऊत आला आहे. माळेगाव साखर कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती असलीतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आणि राजकीय चर्चा देखील दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फुटीनंतर प्रथमच नेत्यांची भेट
शरद पवार आणि अजित पवार यांची मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे भेट झाली. बुधवारी सायंकाळी पाच वाजता काका-पुतणे भेटले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात प्रत्यक्षपणे झालेली ही पहिलीच भेट आहे. कारण, यापूर्वी काहीवेळा शरद पवार आणि अजित पवार भेटले होते, पण ते कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा एखाद्या संस्थेच्या बैठकीसंदर्भाने भेटले होते. मात्र, आज चक्क काका आणि पुतण्या यांच्यात ठरवून भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, शरद पवार मागील दोन दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे गत दोन दिवसांतील सगळ्या भेटी त्यांनी रद्द केल्या. शरद पवार बुधवारी सकाळपासून सिल्व्हर ओकला होते मात्र संध्याकाळी पाच वाजता ते वाय.बी. चव्हाण सेंटर येथे आले आणि त्यानंतर अजित पवार त्याठिकाणी आले. या दोन्ही नेत्यांमध्ये येथे तब्बल एक तास चर्चा झाली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या भेटीचं स्वागत केलं आहे. दोन वरिष्ठ नेते भेटले तर त्यात गैर नाही, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसदर्भाने, सामाजिक विषयाच्या अनुषंगाने ही भेट झाली असावी. महाराष्ट्राच्या विकासासाठीच ही भेट झाली असावी, अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी दिली आहे.