Thane Municipal Corporation’s encroachment department head arrested while accepting a bribe of Rs 25 lakhs ठाणे (1 ऑक्टोबर 2025) : ज्यांच्यावर अतिक्रमण हटवण्याची जवाबदारी आहे त्याच विभागाच्या प्रमुखाने बिल्डरकडून अतिक्रमण हटवण्यासाठी 50 लाखांची लाच मागितली व पहिल्या टप्यातील 25 लाखांची लाच घेताना त्यास एसीबीने बेड्या ठोकल्या. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार यानिमित्ताने उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शंकर पाटोळे असे अटकेतील लाचखोराचे नाव आहे.

पाटोळे यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची जवाबदारी आहे. रात्री उशिरापर्यंत नौपाडा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे लाच प्रकरण ?
मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाची घंटाळी परिसरात जागा आहे. या जागेवर अतिक्रमण झाल्याने ते हटविण्यासाठी पाटोळे यांनी 50 लाखांची लाच मागितली व दहा लाख रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी सुपूर्द केले. त्यानंतर उर्वरित 40 लाख रुपये देण्याआधी या बांधकाम व्यावसायीकाने थेट मुंबईच्या एसीबीकडे तक्रार केली.
मुंबई एसीबीच्या विशेष पथकाने बुधवारी सापळा रचून पाटोळे यांना उर्वरित 40 पैकी 25 लाखांची लाच स्वीकारताना अटक केली. एसीबीच्या अधिकार्यांनी कार्यालयातील कागदपत्रांची उशिरापर्यंत छाननी केली. त्याचवेळी त्यांच्या घरी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवरून आयुक्त राव यांना अक्षरश: धारेवर धरल्यावर ही कारवाई सुरू झाली मात्र ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारे हेच अधिकारी असल्याचे आता उघड झाले आहे.
वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये शिंदे गटाच्या नगरसेवकांची नावे
दोन दिवसापूर्वीच अतिक्रमण विभागातील एका माजी अधिकार्यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. यामध्ये या माजी अधिकार्याने शंकर पाटोळे यांच्यासकट सेवेत असलेल्या अधिकारी आणि शिंदे गटातील माजी नगरसेवकांची नावे देखील घेतली होती त्यामुळे यामध्ये ठाणे पालिकेचे इतर अधिकारी देखील चौकशीच्या फेर्यात अडकण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटातील माजी नगरसेवक ही बेकायदा बांधकामे प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.