शिरपूर पोलिसांची कारवाई ; बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त ; दोन आरोपींना अटक

Fake liquor factory destroyed in Shirpur : Two accused arrested शिरपूर (1 ऑक्टोबर 2025) : शिरपूर पोलिसांनी बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करीत दोन आरोपींना अटक केली आहे तर याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर शहर पोलिसांना बनावट दारूबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वाघाडी, ता.शिरपूर येथील सुभाषनगर जवळील पारधीवाडा भागात छापेमारी केली. पोलिसांनी छाप्यात 440 लिटर स्पिरीट, तब्बल दोन हजार रिकाम्या दारूच्या बाटल्या, तयार केलेल्या दारूच्या बॉटल्स, विविध साहित्य तसेच बोलेरो पिकअप वाहन मिळून एकूण चार लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी चेतन राजु भोई (28) व तुषार प्रभाकर बारी (26, दोन्ही रा.आदर्शनगर, शिरपूर) यांना बेड्या ठोकल्या तर आरोपींना न्यायालयाने 1 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपींच्या चौकशीत श्रीराम बाबर (साक्री) व हर्षल वसंत भंडारी (पाथर्डी फाटा, नाशिक) या संशयीतांनी बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व दारूची विक्री करण्यासाठी सहकार्य केल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात आले.

यांनी उद्ध्वस्त केला दारूचा कारखाना
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शाखाली शिरपूर शहर निरीक्षक किशोरकुमार परदेशी, एपीआय हेमंत पाटील, फौजदार संदीप दरवडे, हेमंत खैरनार, सुरेश सोनवणे, हवालदार रवींद्र आखडमल, राजेंद्र रोकडे, कॉन्स्टेबल आरीफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भटु साळुंके, विनोद आखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, मनोज दाभाडे व विवेकानंदन जाधव आदींच्या पथकाने केली.