Varangaon police handcuffs suspect with village gang भुसावळ (2 ऑक्टोबर 2025) : वरणगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणार्या आरोपीला अटक केली आहे तर आरोपीचा साथीदार पसार झाला आहे. अटकेतील आरोपीकडून पाचशे रुपये लिहिलेल्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटांचे नऊ बंडल (प्रत्येक बंडलात शंभर नोटा) जप्त करण्यात आल्याने संशयीत कुणाचीतरी फसवणूक करणार असल्याचा संशय यंत्रणेला आहे.

कावीन बाबू भोसले (25, रा.हलखेडा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे तर सुजान चट्टान भोसले (रा.हलखेडा, ता.मुक्ताईनगर) असे पसार आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाई
वरणगावचे सहाय्यक निरीक्षक अमितकुमार बागुल यांना गावठी कट्ट्याच्या धाकावर संशयीत दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले.
फुलगाव शिवारातील महामार्ग क्रमांक 53 वरील सर्व्हिस रोडवर दोन संशयीत दुचाकीवर उभे असताना पथकाने सापळा रचताच अंधाराचा फायदा घेत एक संशयीत पसार झाला तर कावीन भोसले हाती लागला. आरोपीच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचा कट्टा, चार हजार रुपये किंमतीचे जिवंत काडतूस, पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल व 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.टी.8802) मिळून 79 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 30 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी, पोलिस कर्मचारी यासीन पिंजारी, अजय निकम, गणेश राठोड, प्रशांत ठाकुर, गोपीचंद सोनवणे, ईश्वर तायडे, फिरोज पठाण, मनोज म्हस्के यांच्या पथकाने केली. पोलिस नाईक मनोज म्हस्के यांच्या फिर्यादीवरून काविन भोसले व सुजल पवारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.