अमळनेरात गॅस सिलिंडरमधून कारमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग : पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Amalner police take major action: Raid while illegally refilling gas अमळनेर (2 ऑक्टोबर 2025) : जिल्ह्यात सर्वत्र घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून अवैधररित्या रिफिलिंग होत असताना अमळनेर पोलिसांनही कारवाई करीत सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता बजरंग पॅलेस जवळ मिल चाळ परिसरात ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिलचाळ परिसरात चारचाकी वाहन (क्रमांक एम.एच.54 डी.1879) मध्ये अवैधरित्या गॅस भरण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. अल्पवयीन मुलाच्या दुकानावर गौरव हरी चौगुले (रा.मिळचाळ), जितेंद्र रवींद्र उदेवाल (रा. गुरुकृपा कॉलनी) हे तिघे जण इलेक्ट्रिक पंपाच्या साहाय्याने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर मधून वाहन क्रमांक (एम.एच.54 डी.1879) मध्ये गॅस भरत असल्याचे आढळले. पोलिसांनी दोघा तरुणांना अटक करून अल्पवयीन मुलाला नोटीस देऊन सोडले.

पथकाने दोन भारत गॅस व दोन एच.पी.गॅसचे चार सिंलिंडर, इलेक्ट्रिक पंप आणि पाच लाख रुपयांची चारचाकी असा एकूण 5 लाख 19 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भूषण परदेशी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

यांनी केली कारवाई
अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, भूषण परदेशी, सुमित वानखेडे तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख, पुरवठा निरीक्षक सचिन निकम यांनी ही कारवाई केली.