Leopard attacks child in Dhulepada tribal settlement ; Child saved after father resists यावल (4 ऑक्टोबर 2025) : यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी धुळे पाडा या आदिवासी वस्तीवरील रहिवासी सहा वर्षीय बालक वडिलांसोबत शेतातून येत असताना अचानक बिबट्याने हल्ला चढवला. यावेळी बालक ओरडल्याने त्याच्या वडिलांनी डोक्यावर असलेले गवताची ओझेचं थेट बिबट्यावर फेकले आणि बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेत सुदैवाने बालक थोडक्यात बचावला आहे मात्र या हल्ल्यात बालकास जबर दुखापत झाली. बालकावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करीत जळगाव हलवण्यात आले.

काय घडले बालकासोबत ?
डोंगरकठोरा, ता.यावल येथून जवळच सातपुड्याच्या कुशीत धुळे पाडा हा आदिवासी पाड्यावरील इगरा झेंदला बारेला (28) हा तरुण त्याच्या मुलगा महेश इगरा बारेला (6) याला सोबत घेवून गुरूवारी शेतात गुरे-ढोरांसाठी गवत आणायला गेला होता. गवत कापणी झाल्यानंतर तो गवताचे ओझे घेऊन घरी येत असतांना सायंकाळी त्याच्यामागे येत असलेल्या त्यांच्या मुलावर अचानक बिबट्याने बालकावर हल्ला केला.
बालक जोरात ओरडल्याने इगला बारेला याने डोक्यावरील ओझेच थेट बिबट्याच्या अंगावर फेकत प्रतिक्रार केला आणि बिबट्या तिथून पळाला. या घटनेत सहा वर्षीय बालक बचावला मात्र त्याच्या डोक्याला, मानेजवळ जबर दुखापत झाली. तातडीने त्याला यावल ग्रामीण उपचार करण्यात आले. येथे त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, अमोल अडकमोल सह आदींनी उपचार केले व शुक्रवारी त्यास पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.