Truck hits bike on Mor River bridge : Biker killed in Takarkheda यावल (5 ऑक्टोबर 2025) : यावल तालुक्यातील अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावर शनिवारी भुसावळकडून यावलकडे येणार्या दुचाकीला यावलकडून भुसावळकडे जाणार्या ट्रकने धडक दिल्याने टाकरखेडा, ता.यावल येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर अंजाळे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना माहिती देऊन मृतदेह यावल ग्रामीण आणण्यात आला. आठवड्याभरात या ठिकाणी अपघातात दोन जण दगावले असून वळणावरच वाढलेले काटेरी झुळपे अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

असा घडला अपघात ?
अंजाळे, ता.यावल येथील मोर नदीच्या पुलावर यावलकडून भुसावळकडे ट्रक (क्रमांक एम. एच. 34 बी.जी. 5015) येत असताना त्याचवेळी भुसावळकडून यावलकडे दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 डी.क्यु.7369) जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार संतोष उखर्डू धनगर (55, टाकरखेडा, ता.यावल) हे जागीच ठार झाले.
अपघातानंतर तातडीने ग्रामपंचायतचे सदस्य आनंद सपकाळे, नितीन सपकाळे, बाळू सपकाळे, अनिल सपकाळे, मंगेश कोळी, संदीप सपकाळे यांनी धाव घेतली व तातडीने यावल पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले व मयत यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तर या प्रकरणी यावल पोलिसात दीपक धनगर यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.