मेहरुण तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी आढळला

पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

मेहरुण तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी आढळला

जळगाव (प्रतिनिधी) – ईदच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मेहरुण तलाव परिसरात गेलेल्या पाच तरुणांपैकी तांबापूरा येथील नदीम शेख (वय २३) या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (७ जून) दुपारी दोनच्या सुमारास घडली. सलग शोध मोहिमेनंतर रविवारी सकाळी सात वाजता नदीमचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

शनिवारी बकरी ईदची सुट्टी असल्याने नदीम शेख आपल्या मेहुणे अझहर खान, मामेभाऊ इरफान शेख, तोहीत खान आणि मित्र मोहसीन खान यांच्यासोबत मेहरुण तलाव परिसरात गेला होता. तापमान वाढल्याने सर्वजण तलावात आंघोळीसाठी उतरले. सुरुवातीला नदीम काठावर थांबला होता, मात्र काही वेळाने तोही पाण्यात उतरला आणि पोहत असताना अचानक खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. इतर मित्रांनी मदतीचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत नदीम पाण्यात बुडाला.

शोध मोहिम अपयशी, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस, महापालिका आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नातेवाईकांनी मदत कार्यात दिरंगाई झाल्याचा आरोप केला. शनिवारी रात्रीपर्यंत शोध सुरु होता, मात्र नदीमचा काहीही थांगपत्ता लागला नव्हता. अखेर रविवारी (८ जून) सकाळी सात वाजता मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवला. यावेळी नातेवाईकांनी हंबरडा फोडत एकच आक्रोश केला. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनास्थळी आमदार सुरेश भोळे, तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह पोलीस व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.