वाक गावात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक; महसूल विभागाची कारवाई

एक ट्रॅक्टर जप्त; डंपर चालक फरार, पुढील कारवाईस सुरुवात
भडगाव (प्रतिनिधी):
भडगाव तालुक्यातील वाक येथील गिरणा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाई केली. सोमवारी सकाळी ७.३० वाजता पथकाने ही धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केले असून, ते ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे आणि महसूल सहाय्यक महादू कोळी यांनी “अवैध वाळू वाहतूक प्रकरणात जप्त ट्रॅक्टरवर लवकरच दंडात्मक कारवाई होणार आहे,” असे सांगितले.
ही कारवाई तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात महादू कोळी, गितेश महाजन, प्रशांत कुंभारे, एम. जे. खाटीक, अभिमन्यू वारे यांचा समावेश होता.
दरम्यान, पथक खाजगी वाहनातून रात्री गस्त घालत असताना, त्यांनी भडगाव परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलाग सुरू केला होता. मात्र, डंपर चालकाने वाहतुकीची कोणतीही पर्वा न करता पारोळ्याकडे सुसाट धाव घेतली आणि घटनास्थळावरून फरार झाला.
यासंदर्भात महसूल विभागाने सांगितले की, “डंपर पळून गेला असला तरी तो लवकरच ताब्यात घेतला जाईल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल.”
गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा व वाहतूक थांबवण्यासाठी महसूल विभागाची मोहीम सुरूच राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.