क्रिकेट सामना पाहून परतणाऱ्या मुलांच्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात ; बोदवडचे 2 जण ठार तर 11 जण जखमी

नेवासा तालुक्यातील घटना
नेवासा (प्रतिनिधी) :नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी (दि. ९ जून) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. क्रिकेट सामने पाहून बोदवडकडे परतणाऱ्या मुलांच्या क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रथमेश तेली (रा. बोदवड) याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला, तर वृषभ सोनवणे (रा. बोदवड) याचा उपचारादरम्यान नगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला.
एमपीएल क्रिकेट पाहण्यासाठी गहुंजेला गेले होते खेळाडू
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट्स अकॅडमीतील १३ खेळाडू पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथे एमपीएल (MPL) क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी गेले होते. स्पर्धा पाहून ते क्रुझर गाडीने परत येत असताना, नेवासा तालुक्यातील उस्ठळ दुमाला गावाजवळ संभाजीनगर महामार्गावर त्यांच्या गाडीने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
अपघातात ११ खेळाडू जखमी, शिक्षक गंभीर
या धडकेत गाडीत बसलेले अन्य ११ खेळाडू जखमी झाले असून, नेवासा फाटा येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात अकॅडमीचे एक शिक्षकही गंभीर जखमी झाले असून, त्यांचा एक पाय निकामी झाल्याचे समजते.
पोलीस यंत्रणा तत्काळ सक्रिय
अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली. अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.