आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी जळगाव जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत साजरी

जळगाव
जिल्हा जळगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आज महान आदिवासी नेते आणि आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्वक साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित माहिती दिली गेली. उपस्थित अधिकारी, कर्मचारी, तसेच आदिवासी समाजबांधव यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आदिवासी हक्कासाठी मोठा लढा दिला होता. त्यांनी झारखंड आणि आसपासच्या भागातील आदिवासी समाजात जागरूकता निर्माण केली व स्वाभिमान जागवला. त्यांचे कार्य आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “बिरसा मुंडा यांचे विचार आणि आदर्श आम्हाला आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही त्यांच्या कार्याचा गौरव करतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.”
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात पार पडले. सदर कार्यक्रमाला कार्यालयीन सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थिती लावुन आदरांजली अर्पण केली.