कुसुंबा येथे घरफोडी; ७.९ तोळे सोने आणि रोख २० हजार रुपये लंपास

कुसुंबा येथे घरफोडी; ७.९ तोळे सोने आणि रोख २० हजार रुपये लंपास

चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील कुसुंबा गावात दि. १० जूनच्या रात्री मोठ्या प्रमाणात चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी एका घराचे मागील दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून घरात घुसून सुमारे ७.९ तोळे सोने आणि २० हजार रुपये रोख असा एकूण सात लाख छत्तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

ही घटना तुषार शामकांत पाटील (रा. परसी चौक, कुसुंबा) यांच्या घरी रात्री ८ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. घरातील सदस्य झोपेत असताना चोरट्यांनी मागच्या दरवाजाचा वापर करत घरात प्रवेश केला आणि कोणालाही काही कळू न देता मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून फरार झाले.

या प्रकरणी तुषार पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस कर्मचारी आणि तांत्रिक पथकांनी तपासाला सुरूवात केली. श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब आणि फिंगरप्रिंट युनिट यांनीही घटनास्थळी तपास केला.

श्वान पथकाने घोडगाव रस्त्यावरील गाव दरवाजापर्यंत चोरट्यांचा माग घेतला. तेथे असलेल्या एका नळाजवळ चोरट्यांनी हातपाय धुतल्याचा संशय असून, त्यानंतर श्वान पथकाचा मागोवा थांबला.

सध्या पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकारामुळे कुसुंबा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.