वेरुळी-बहुळा मार्गावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द ते बहुळा धरण मार्गावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
ही घटना मंगळवारी (११ जून) दुपारी घडली. भगवान सुभाष पाटील (वय ३८, रा. वेरुळी खुर्द) हे आपल्या शेतातील काम आटपून घरी परतत असताना, वडगाव टेक येथील विकास मांगो यशवद (वय ३०) हे त्यांच्या मोटरसायकलवरून वेरुळीकडून येत होते. दरम्यान, दोघांच्या मोटरसायकलीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात भगवान पाटील यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर विकास यशवद हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मयत व जखमी यांना रुग्णवाहिकाचालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातास कारणीभूत असलेल्या घटनेचा तपास पाचोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.