जळगावात तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात!

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत जेरबंद केले. धीरज दत्ता हिवराळे असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आज, १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, सम्राट कॉलनीतील परिसरात एक तरुण तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करत असल्याचे समजले. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे धीरज हिवराळे हा तलवार हातात धरून आरडाओरड करत दहशत माजवताना आढळला. पथकाने त्याला त्वरित ताब्यात घेतले आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलीस पथकाचे कौतुकास्पद कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. प्रविण भालेराव, अक्रम शेख, विजय पाटील, हरीलाल पाटील, किशोर पाटील, प्रदीप चवरे आणि रविंद्र कापडणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.