अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव-जामनेर रस्त्यावर उमाळे शिवारात भीषण अपघात
जळगाव (प्रतिनिधी) : उमाळे गावाजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत शेतकऱ्याचे नाव शरद समाधान पाटील (वय ४०, रा. उमाळे) असे आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शरद पाटील हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आपल्या शेतात शेतीच्या कामासाठी गेले होते. संध्याकाळी ते दुचाकीवरून घरी परतत असताना जळगाव-जामनेर मुख्य रस्त्यावर उमाळे शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की शरद पाटील रस्त्यावर दूर फेकले गेले आणि जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघात घडवणाऱ्या वाहनाचा शोध सुरू करण्यात आला आहे. मृत शरद पाटील यांचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.