सराव, आहार आणि तंदुरुस्तीने खेळात यश मिळते – प्र-कुलगुरू प्रा. इंगळे यांचे प्रतिपादन

जळगाव ( प्रतिनिधी) : “सराव, संतुलित आहार आणि तंदुरुस्त राहण्याच्या सवयी अंगीकारल्या तर खेळात प्राविण्य मिळवता येते,” असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी मैदानी खेळांच्या सराव शिबिराच्या समारोपप्रसंगी केले.
या वेळी अधिसभा सदस्य स्वप्नाली काळे-महाजन, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील व कक्ष अधिकारी प्रवीण चंदनकर मंचावर उपस्थित होते.
विद्यापीठात ३ जूनपासून सुरू असलेल्या या शिबिरात विविध भागातील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात १००, २००, ८००, १५००, ५ हजार व १० हजार मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, अर्ध-मॅरॉथॉन आणि रिले स्पर्धांचा सराव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांद्वारे सरावामुळे आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मनोहर सूर्यवंशी (शहादा), बालदी वसावे (तळोदा), अल्पेश भोई (दोंडाईचा), खुशी घुले (चाळीसगाव) यांनी आपल्या भावना व्यक्त करत शिबिराचे महत्त्व अधोरेखित केले.
शिबिराचे सूत्रसंचालन प्रा. शैलेश पाटील यांनी तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. दिनेश पाटील यांनी केले.