राम मंदिर परिसरात खोदकामादरम्यान सापडले तांब्याच्या भांड्यातील ऐतिहासिक नाणे

१८० तांब्याची आणि ८ चांदीची नाणे जप्त; तहसील प्रशासनाकडून पंचनामा
पारोळा (प्रतिनिधी) : येथील पुरातन व ऐतिहासिक श्रीराम मंदिराच्या कंपाउंड वॉलच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान तांब्याच्या भांड्यात ठेवलेली जुनी नाणी सापडल्याची घटना मंगळवारी (दि. ११) दुपारी घडली. यामध्ये १८० तांब्याची आणि ८ चांदीची नाणी आढळून आली असून प्रशासनाने नाण्यांचा पंचनामा करून ती ताब्यात घेतली आहेत.
श्रीराम मंदिराच्या चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदकाम करत असताना जेसीबी मशीन ऑपरेट करणाऱ्या अरुण भोई यांना जमिनीत तांब्याचे भांडे दिसले. त्यांनी ही बाब तत्काळ मंदिराचे मुख्य विश्वस्त गोपाल अग्रवाल यांना कळवली.
घटनेची माहिती मिळताच गोपाल अग्रवाल यांनी पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच तहसीलदार देवरे, कोषागार अधिकारी एच. जे. बोरुडे, एपीआय चंद्रसेन पालकर आणि सर्कल अधिकारी निशिकांत माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि नाणी ताब्यात घेतली.
प्राथमिक अंदाजानुसार, तांब्याची नाणी प्रत्येकी सुमारे २० ग्रॅम वजनाची असून, चांदीची नाणी प्रत्येकी अंदाजे १० ग्रॅमची आहेत. ही नाणी नेमकी कोणत्या कालखंडातील आहेत, याचा तपास अधिकृत अहवालाद्वारे केला जाणार आहे.
या वेळी मंदिर संस्थानचे विश्वस्त अॅड. दत्ता महाजन, कल्पेश अग्रवाल व परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.