शेतात काम करणाऱ्या तिघांचा वीज पडून मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, (दि. 15) दुपारी चाळीसगाव तालुक्यातील मौजे कोंगानगर येथे शेतात काम करणाऱ्या तिघांचा वीज पडून मृत्यू झाला. मृतांत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर एक जण जखमी झाला आहे.
लखन दिलीप पवार (वय 14, रा कोंगानगर), दशरथ उदल पवार (वय 24, रा. कोंगानगर), समाधान प्रकाश राठोड (वय 9, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत. तर दिलीप उदल पवार (वय 35) असे जखमीचे नाव आहे.
चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी यांनी भेट घेऊन सांत्वन केले.