राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत किनगावच्या दिशा पाटीलचे सुवर्णपदक

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत किनगावच्या दिशा पाटीलचे सुवर्णपदक

प्रतिनिधी | यावल

जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथील दिशा विजय पाटील हिने चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत उज्वल यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन व हॉक कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २४ जून दरम्यान बरोरा, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती.

दिशा सध्या जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनची प्रतिनिधी असून ५७ ते ६० किलो वजन गटात खेळताना तिने आपल्या आक्रमक आणि कौशल्यपूर्ण खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या दिग्गज महिला बॉक्सर्समध्ये ती ठळकपणे उठून दिसली.

प्रत्येकीला नमवत सुवर्णावर निशाणा

पहिल्या फेरीत: पुण्याच्या खेळाडूवर विजय

दुसऱ्या फेरीत: शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती पूनम कैथवास (अकोला) हिचा पराभव

अंतिम फेरीत: रुचिका काते (वर्धा) हिला हरवत सुवर्णपदकावर कब्जा

दिशा पाटीलला यशामागे जिल्हास्तरीय ‘खेलो इंडिया’ बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रशिक्षक नीलेश बाविस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

दिशाच्या या घवघवीत यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, रोहिदास पाटील यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.