बडनेरा-नाशिक रोड मेमू रेल्वेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव : जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित मेमू रेल्वे आणखी तीन महिने धावणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने या गाडीला ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नाशिकला दुपारच्या वेळेत जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पूर्वी ही गाडी ३० जूनपर्यंत चालवण्याचे नियोजन होते. मात्र प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, एक जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ती चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत ९२ फेऱ्या होणार आहेत.
ही मेमू गाडी बडनेरा ते नाशिक रोड या दरम्यान धावते आणि जळगाव जिल्ह्यातील बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव आणि चाळीसगाव या स्थानकांवर थांबते.
याआधी भुसावळ ते इगतपुरी किंवा देवळाली दरम्यान धावणाऱ्या गाड्यांशिवाय नाशिकला दुपारच्या वेळेस जाण्यासाठी पर्याय नव्हता. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये असलेल्या प्रचंड गर्दीमुळे स्थानिक प्रवाशांचे हाल होत होते. मात्र, ही विशेष मेमू गाडी सुरू झाल्यानंतर साधारण साडेतीनच्या सुमारास नाशिकला जाण्यासाठी एक सोयीची व्यवस्था निर्माण झाली आहे.
प्रवाशांची मागणी : या गाडीला प्रत्येक तीन महिन्यांनी दिली जाणारी मुदतवाढ थांबवून ती कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.