कर्जाच्या वादातून नातवाने केला आजीवर कुऱ्हाडीने हल्ला

धरणगाव शहरातील घटनेने खळबळ; आरोपी नातवाला अटक
धरणगाव (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मानसिक तणावात असलेल्या नातवाने आपल्या ७० वर्षीय आजीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २६ जून) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास धरणगाव शहरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जखमी लीलाबाई रघुनाथ विसपुते (रा. महाबळ, जळगाव) यांच्यावर जळगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) याला ताब्यात घेतले आहे.
घटनेचा तपशील
लीलाबाई या सध्या आपल्या मुली वैशाली पोतदार यांच्या घरी धरणगावात राहात होत्या. वैशाली यांचा मुलगा तेजस पोतदार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. मात्र सततच्या तोट्यांमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते, त्यामुळे घरात वारंवार वाद होण्याचे प्रसंग घडत होते.
गुरुवारी दुपारी लीलाबाई आणि तेजस यांच्यात तीव्र वाद झाला. त्यानंतर लीलाबाई झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेल्या. काही वेळात तेजसने कुऱ्हाड हाती घेतली आणि झोपेत असलेल्या आजीवर अचानक हल्ला केला.
तेजसचा भाऊ अक्षय याने त्याला कुऱ्हाड घेऊन जाताना पाहिले होते. यावेळी तेजसने “पिंपळाचं झाड तोडायला चाललोय” असे सांगून बहाणा केला. परंतु काही वेळातच त्याने आजीवर हल्ला केल्याचा बनाव करत अक्षयकडे धाव घेतली. लीलाबाई रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी लीलाबाई यांचे नातू उमेश धीरेंद्र विसपुते यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार तेजस पोतदार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.