चोपडा शहरात गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद

चोपडा शहरात गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा शहरातील कन्नस्थाना परिसरात गावठी पिस्तूल लावून दहशत माजवत फिरणाऱ्या तरुणास शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अटक केली. ही घटना बुधवार, २६ जून रोजी सायंकाळी ६.४५ वाजता घडली असून, या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिका पाठीमागील कन्नस्थाना भागात एक तरुण हातात शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयितास ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला अंदाजे ४०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला.

तपासादरम्यान आरोपीचे नाव कार्तिक रविंद्र पवार (वय २१, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) अन्वये व कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, तसेच सफो जितेंद्र सोनवणे, दीपक विसावे, पोहेकॉ संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, हर्षल पाटील, पोना संदीप भोई, पोकों विनोद पाटील, निलेश वाघ, प्रकाश मधुरे आणि प्रमोद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत असून, आरोपीचा गावठी पिस्तूल बाळगण्यामागचा हेतू, तसेच त्याचे कोणाशी संबंध होते, याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.