एरंडोलमध्ये माजी उपनगराध्यक्षावर पूर्ववैमनस्यातून हल्ला ; तिघांना अटक

एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल येथील माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावर १४ जून रोजी झालेला हल्ला हा अपघात नसून पूर्वनियोजित कट होता, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडीही जप्त करण्यात आली आहे.
राजकीय वादातून कट रचल्याचा संशय
माजी नगरसेविका कल्पना महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दशरथ महाजन यांचे काही स्थानिक राजकीय नेत्यांशी मतभेद होते. त्यामुळे हा हल्ला घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.
सीसीटीव्ही तपासातून आरोपींची ओळख
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली. पोलिस हवालदार प्रवीण मांडोळे आणि राहुल कोळी यांनी पेट्रोल पंपावरील तब्बल ८ तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवली.
तिघांना अटक, गुन्ह्याची कबुली
तपासात उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (४०), शुभम कैलास महाजन (१९) आणि पवन कैलास महाजन (२०) (सर्व रा. एरंडोल) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, मुख्य आरोपी उमेश याने वैयक्तिक वैमनस्यातून हा हल्ला केल्याचे सांगितले आहे.
तपास अधिक खोलात
गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी जप्त करण्यात आली असून, अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आणि त्यांच्या टीमने केली.